डॉ.आकांक्षा देशमुख खुन प्रकरण, एमजीएम प्रशासनाविरोधात सोशल मिडियावर संतापाची लाट

Foto

औरंगाबाद- शिक्षण क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वसतिगृहात फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ.आकांक्षा देशमुख हीची हॉस्टेलच्या रुममध्ये घुसून, गळा दाबून खुन केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. या घटनेला चार दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही. मात्र आकांक्षाच्या मृत्यूला एमजीएम प्रशासनच जबाबदार आहे, आणि संस्थेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. अशा आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यात Justice for Akanksha अशी हॅशटॅग मोहीम फेसबुकवर चालविण्यात येत आहे.

 

काय आहे ही पोस्ट

आकांक्षाचा गळा आवळून खून झाला तर कुणालाच काही ऐकू कसं आलं नाही? वसतिगृहाचे सुरक्षारक्षक काय करत होते? मृत्यू झाल्याचं कळण्यासाठी 24 तास का लागले? आकांक्षाची चौकशी करण्यासाठी कुणीच कसं गेलं नाही? एमजीएम हॉस्टेलमधल्या विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत का? असे अनेक प्रश्न या पोस्टमध्ये उपस्थित केल्या गेले आहेत. याशिवाय स्वत:ची प्रतिमा राखण्यासाठी एमजीएम संस्था हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. असा गंभीर आरोप या पोस्टमधून करण्यात आलेला आहे.

 

अभाविपने केली सीआयडी चौकशीची मागणी

आकांक्षाच्या खुन प्रकरणानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा निषेध म्हणून अभाविपतर्फे सोमवारी(ता.१६) आंदोलन करण्यात येणार आहे.